भिवंडी ( राजेंद्र पाटील )
भिवंडी-पारोळ महामार्गावर प्रवास करत असाल तर जरा जपून कारण, भिवंडी तालुक्यातील भिवंडी-पारोळ महामार्गावर रायपाडा (झारोटा) येथे झिंदाबाद किराणा दुकानाच्या बाजूला पारोळ च्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी स्वाराला भुरट्या चोरांनी भरदिवसा दुपारी १२ वाजता गळ्यातील सोन्याची चैन ( अंदाजे रक्कम ६२,०००रुपये ) चोरून पोबारा केल्याची घटना नुकतीच घडली आहे.
लाखीवली-माजीवडा येथील बाळाराम राघो शेळके (45) हे आपल्या घरातील किराणा माल खरेदी करण्यासाठी भिवंडी येथे गेले होते. बाजार हाट करून भिवंडी वरून घरी परतत असतांना रायपाडा (झारोटा) येथे आले असता दोन अनोळखी व्यक्ती रस्त्यात उभ्या होत्या. त्या व्यक्तींनी बाळाराम शेळके यांना थांबविले व सांगितले की, आम्ही पोलीस आहोत काल रात्री याच ठिकाणी परदेशी साहेबांचा दागिन्यांमुळे खून झालेला आहे त्याचा तपास सुरू आहे,तेव्हा पुढे पोलीस चेकिंग करत असल्याने तुम्ही तुमच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून ठेवा असे सांगितले. सदरील दोन अज्ञात व्यक्तीने बाळाराम यांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून ती कागदा मध्ये पुडी बांधून त्यांच्या हातात दिली व सांगितले की, तुम्ही लवकर घरी जा.बाळाराम शेळके हे शंभर मीटर च्या अंतरावर गेल्याने त्यांना संशय आला की,आपणास फसवले. ते त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून थांबले व ती पुडी सोडून बघितली असता त्यामध्ये माती व खडे सापडले .सदरील व्यक्ती हे वर्णनाणे उंच, धट्टे -कट्टे तोंडाला मास लावलेले व एकाचा राखाडी कलरचा शर्ट तर दुसऱ्याचा बारीक लायनिंग चा शर्ट अशा वर्णनाचे असून त्यांच्या कडे दुचाकी होती.बाळाराम शेळके हे आपल्या घरी गेले व झालेला प्रकार त्यांनी आपल्या पत्नीला सांगितला .आगोदरच कोरोना च्या महामारीमध्ये सर्व काम धंदे बंद असल्याने सोन्याची चैन चोरीला गेल्याने बाळाराम शेळके यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे .या घटनेची नोंद भिवंडी तालुका पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.