भिवंडी (रमण पंडित)- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वादग्रस्त विधानाचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले असून मंगळवारी शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीने राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. भिवंडीत शिवसेना शहरप्रमुख सुभाष माने यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी पोलीस उपायुक्त कार्यालयाजवळ राणेंविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांच्या फोटोला चक्क चपला मारल्या तर बॅनरवर कोंबडी चोर म्हणत नारायण राणेंचा निषेध नोंदविला. यावेळी नारायण राणेंविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. त्याचबरोबर राज्यात ठिकठिकाणी नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हे दाखल होत असून भिवंडीत देखील राणेंवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन दिल्यानंतर नारायण राणे यांच्या फोटोला "जोडो मारो" आंदोलन करण्यात आले. शिवसेना शहर प्रमुख सुभाष माने, नगरसेवक श्री. अशोक भोसले, शिवसैनिक आणि महिला पदाधिकाऱ्यांनी नारायण राणे यांच्या फोटोला चप्पलेने मारले. मा.पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे साहेब आणि शिवसेनेची बदनामी करणाऱ्यांना यापुढे शिवसेना स्टाईलने धडा शिकविला जाईल असा इशाराही देण्यात आला. कोरोनाचे नियम पाळून सदर आंदोलनाला शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक, महिला आघाडी उपस्थित होत्या.
भिवंडीत जोडो मारो" आंदोलन करण्यात आले.