आदिवासी वाड्यांना प्रशासनाची साथ; जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचा थेट दौरा, समस्या समजून घेतल्या व तात्काळ उपाययोजना सुरू
(जिल्हा परिषद, ठाणे) – जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात दि. २३ जुलै, २०२५ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे व गटविकास अधिकारी (शहापूर) बी. एच. राठोड यांनी ग्रामपंचायत अजनूप अंतर्गत येणाऱ्या दापूर माळ व खोरगडेवाडी या आदिवासी वाड्यांना थेट भेट देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.

          या वाड्यांमध्ये जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता उपलब्ध नाही. ग्रामपंचायत माळ येथून सुमारे ५ किलोमीटरचा दगडधोंड्यांनी भरलेला, चिखलामधून जाणारा मार्ग पार करून स्थानिकांना पायी प्रवास करावा लागतो. सन २०१६-१७ ते २०२१-२२ दरम्यान ११ व २०२४-२५ मध्ये २२ घरकुले मंजूर करण्यात आली असून घरकुले बांधकाम सुरू करण्यात यावीत, याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्देश दिले. 

          तसेच, वाड्यावर अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळा असून, इमारत बांधण्यासाठी लागणारे साहित्य पोहोचवणे शक्य न झाल्याने अद्याप त्या शासकीय इमारती उभारल्या गेलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर घुगे यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी त्यांनी घरकुल बांधकामासाठी CSR निधीमधून विशेष सहाय्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

          पाण्याची सोय न झाल्यामुळे, अजनूप गावातून दोन टप्प्यांत लिफ्टिंगद्वारे पाणीपुरवठा योजनेची रचना करण्यात येणार असून, संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना त्यांनी यासंबंधी तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. जिल्हा परिषद शाळेची इमारत उभारण्यासाठी गटशिक्षणाधिकारी शहापूर यांना तत्काळ प्रस्ताव सादर करून कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
 
          वाड्यापर्यंत रस्ता नसल्यामुळे होणाऱ्या मोठ्या त्रासाची दखल घेत रस्ता वनविभागाच्या क्षेत्रात असल्याने, घुगे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तात्काळ बैठक घेऊन या समस्या निकाली काढण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

         यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळा, अस्नोली येथे भेट देऊन नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांची क्रीडाविषयक आवड लक्षात घेता, त्यांनी विद्यार्थ्यांना बॅडमिंटन साहित्य भेट दिले आणि शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.

       "शासनाच्या योजना त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करायला हवे. केवळ कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्ष दौऱ्यांतून समस्या समजून घेऊन उपाययोजना करणं ही आमची जबाबदारी आहे. अजनूप परिसरातील विकासाला गती देण्यासाठी रस्ते, पाणी व घरकुलाच्या अडचणी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील." - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे रोहन घुगे

          मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या थेट दौऱ्यामुळे आणि समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केल्यामुळे प्रशासकिय कामकाजाला गती प्राप्त झाली असून, हे सकारात्मक पाऊल म्हणून ग्रामस्थांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे.
टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र